मराठा समाजाचा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आंदोलन करतील
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 11:45 PM (IST)
उस्मानाबाद - मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा समाजातील आमदारांनी सकारात्मक भूमिका न घेतल्यास हा मुद्दा घेऊन मराठा सेवा संघ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गवारे यांनी दिला आहे.
श्री. गवारे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला; परंतु मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसाठी हा मुद्दा जिव्हाळ्याचा व सामाजिक बांधिलकीचा आहे. यामध्ये सर्वसामान्य व गरीब मराठ्यांची अस्मिता आहे. गुरुवारी (ता. दहा) नागपूर येथे मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा आमदारांची बैठक होत आहे. यामधून सकारात्मक काही बाहेर पडले नाही तर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मराठा आमदारांची बैठक हे संघटनेच्या प्रयत्नांचे फळ आहे. मराठा समाजावर आरक्षणासाठी अन्याय सुरूच राहिला तर संघटनेच्या सर्व 32 कक्षांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शैक्षणिक संस्था बंद पाडतील, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या सर्व शिक्षकांसह सामूहिक रजा देतील, नामदेव तुकाराम वारकरी परिषद गावागावांमध्ये जागृती करेल, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आंदोलन करतील. लढवय्या मराठ्यांनी आपल्या अस्तित्वाच्या लढ्यात तन-मन-धनाने उतरावे. समाजातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, उद्योजक, व्यावसायिकांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी आपल्या भावना 50 ओळींमध्ये मराठा सेवा संघाच्या कार्यालयात द्याव्यात, असे आवाहन श्री. गवारे यांनी केले आहे