Tuesday, December 29, 2009

'जिजाऊ ब्रिगेड'च्या कार्यकर्त्यांना अटक नाही
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 22nd, 2009 AT 10:01 PM
jijau brigade,shivdharma,maratha

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शासकीय बंगल्यात घुसून आंदोलन करणाऱ्या "जिजाऊ ब्रिगेड'च्या महिला कार्यकर्त्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. खुद्द सहकार मंत्र्यांनीच महिला कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये, असे लेखी पत्र दिल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली.
मंत्रालयात काल मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना दुपारी एक-दीडच्या सुमारास "जिजाऊ ब्रिगेड'च्या 21 महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यात घुसून दरवाजे बंद करून आंदोलन सुरू केले. पाटील यांनी त्यांची मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा घडवून आणतो, असे आश्‍वासन दिल्यानंतर तब्बल दोन तासांनंतर दरवाजा उघडण्यात आला. पाच महिलांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारची भूमिका सांगितली. तोपर्यंत इतर महिलांना अटक न करता बंगल्यातच बसवून ठेवण्यात आले होते.
या महिलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी पोलिसांना दिले. त्यामुळे अटकच काय, परंतु मंत्र्यांचीच तक्रार नसल्यामुळे साधा गुन्हाही त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आला नाही, त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली.

No comments: